लातूर - जळकोट तालुक्यातील कोळनूर येथील विठ्ठल मारोती नरवटे यांचा दोन वर्षांपूर्वी सौदी अरेबियामधील अलबुज येथे मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह मिळावा म्हणून त्यांची पत्नी प्रयत्न करत होती. अखेर आठ महिन्यानंतर त्यांचा मृतदेह मिळाला आहे.
हेही वाचा- पाहा, कसं आहे साईबाबांचे जन्मस्थळ; फक्त ईटीव्ही भारतच्या दर्शकांसाठी...
कोळनूरमधील विठ्ठल मारोती नरवटे दोनवर्षांपूर्वी सौदी अरेबिया या देशात एजंटच्या मदतीने गेले होते. तेथील अलबुज या शहरात ते उंट व मेंढ्या सांभाळण्याचे काम करत असल्याचे ते पत्नीला व नातेवाईकांना सांगत होते. त्यांच्या पत्नीला १६ जून २०१९ रोजी त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. विठ्ठलच्या नातेवाईकांनी मृतदेह एजंटकडे मागितला. त्यांनी आठ दिवसाचा अवधी दिला. आठ दिवस संपले तरी मृतदेह मिळाला नसल्याने नातेवाईकांनी, गावातील नागरिकांनी जळकोटच्या तहसीलदार यांना एकाअर्जाद्वारे मृतदेहाची मागणी केली.
त्यानंतर दोन महिने उलटून गेले. त्यांच्या मागणीची कोणीच दखल घेतली नाही. श्रमिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या महिलेची मागणी लावून धरत जिल्हा अधिकारी, परराष्ट्रमंत्रालय यांना कळवून पाठपुरावा केला. तब्बल आठ महिन्यानंतर १६ जानेवारीला त्यांचा मृतदेह हैदराबादच्या विमानतळावर आणण्यात आला.
त्यानंतर १७ जानेवारीला सायंकाळी कोळनूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विठ्ठल नरवटे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी केलेला आक्रोश सर्वांचे हृदय पिळून टाकणारा होता.
घरचा कर्ता गेल्याने नरवटे कुटुंबावर संकट ओढले आहे. जमीन नाही, लहान चार मुले आहेत. सध्या ग्रामीण भागात मजुरी सुध्दा मिळत नाही. त्यामुळे या महिलेला शासनाने काहीतरी मदतीचा आधार द्यावा ,अशी मागणी होत आहे.