लातूर - जळकोट तालुक्यात सर्वात कमी रुग्ण होते. शिवाय डिसेंबर महिन्यात हा तालुका कोरोनामुक्त झाला होता. पण शहरातील गुरुदत्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात महाविद्यालयात एकूण 32 कर्मचारी आहेत. त्यापैकी 21 जणांच्या टेस्ट केल्या आहेत. यातील दोन शिक्षक व दोन प्राध्यापकांना कोरोना झाला आहे. यामुळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जवळपास १० महिन्यांपासून शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असताना राज्य सरकारने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. त्याच प्रमाणे शहरातील गुरुदत्त महाविद्यालयात 11 वी व 12 वीचे वर्ग गेल्या अनेक दिवसांपासून सकाळी दहा ते एकपर्यंत चालू होते. सोमवारपासून सदरील वर्ग हे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही वर्गात जवळपास दोनशे विद्यार्थी दररोज उपस्थिती लावतात.
चार शिक्षक-प्राध्यापकांना कोरोनाची बाधा-
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपला नाही. त्यामुळे शाळा महाविद्यालयातील शिक्षकांच्या कोरोना चाचणी करण्यात येत आहेत. त्यानुसार गुरदत्त माध्यमिक शाळा-महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये चार जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या महाविद्यालयातील शिक्षकांनी कोरोनाची टेस्ट केली आहे का? शासनाने दिलेले कोरोना नियम पाळले आहेत का? नियम पाळण्यात आले असेल तर कोरोनाचा शिरकाव झाला कसा? असे प्रश्न प्रश्न उपस्थित होत आहेत.
पालकांची करावी लागणार कोरोना तपासणी-
महाविद्यालय कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोनशे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोना टेस्ट करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या कुंटुबांचीही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. महाविद्यालय कोरोनाबाबत दक्षता पाळली नसल्यामुळे कोरोनाच शिरकाव झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महाविद्यालयात एकूण 32 कर्मचारी आहेत यातील दोन शिक्षक व दोन प्राध्यापकांना कोरोना झाला आहे.