लातूर - रविवारी एक नव्या रुग्णाची जिल्ह्यात भर पडली असून सध्या 33 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्याभरात रुग्णांची संख्या घटत असून ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत 111 रुग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत.
लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 150 च्या घरात गेली होती. सुरवातीला जिल्ह्यातील उदगीर शहरात रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, पुण्या-मुंबईहून नागरिकांना येण्याची परवानगी मिळताच संबंध जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन हतबल झाले होते. मात्र, गेल्या आठवड्याभरात रुग्णांची संख्या घटत असून उदगीर तालुका तर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. या तालुक्यात केवळ दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी 25 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. पैकी 24 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असून औसा तालुक्यातील येल्लोरा येथील नवीन कोरोना रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण मुंबई येथून प्रवास करून आला असून त्याला निमोनिया हा आजार आहे. शिवाय त्याला सर्दी, खोकला आणि ताप असल्याने त्याची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे उदगीर, लातूर पाठोपाठ आता औसा तालुक्यात रुग्णांची संख्या ही वाढत आहे. मात्र, उदगीर, निलंगा, लातूर या तालुक्यातून दाखल झालेले सर्व नमुने हे निगेटिव्ह आले आहेत.
त्यामुळे सध्या 33 रुग्णांवर उपचार सुरू असून 111 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.