लातूर- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी तर सर्वाधिक 40 रुग्णांची वाढ झाली आहे. दुसरीकडे 28 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 537 वर पोहोचली आहे. मात्र, सातत्याने वाढत असलेली रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील 220 व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी 40 जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये महानगरपालिका हद्दीत 5, लातूर तालुक्यात 11 तर औसा येथे 8 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर आतापर्यंत 25 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून एक ना अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यात यश आलेले नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खाजगी रुग्णालयेही ताब्यात घेतली जात आहेत. शिवाय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलही लवरकच सेवेत राहणार आहे.
निलंगा तालुक्यात 23 रुग्ण आढळून आल्याने 5 दिवस येथील बाजारपेठ बंद राहणार आहे. मात्र, लातूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असतानाही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही. लॉकडाऊनपेक्षा कडक अंमलबजावणीवर भर देण्याचा मानस जिल्हा प्रशासनचा आहे. परंतु, दिवसागणिक आकडा वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.