लातूर - निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची उजनीचे पाणी लातूरकरांना या अश्वासनावरच पार पडलेल्या आहेत. मात्र, वॉटर ग्रीड प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने विरोध केला असून ज्यांच्या हाती राज्य सरकारचे रिमोट कंट्रोल आहे त्यांच्याच उजनीच्या पाण्याला विरोध आहे आणि येथील लोकप्रतिनिधी यांना मंत्री पद टिकवून ठेवायचे आहे त्यामुळे ते गप्प असल्याचा आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. रिमोट कंट्रोलच्याबाबतीत त्यांनी नावाचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध आहे तर मंत्रीपद कायम राहावे याकरिता पालकमंत्री अमित देशमुख याबाबतीत कोणती भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
उजनीचे पाणी हा लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांनी याबाबतीत आतापर्यंत केवळ राजकारण केले आहे. राज्यात सत्ता येताच महिन्यात उजनीचे पाणी लातूर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले होते. तर वॉटर ग्रीडच्या माध्यमातून 6 महिन्यात पाणी मिळणार असल्याचा दावा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर केला होता. आता सत्तापरिवर्तन होऊन वर्षाचा कालावधी लोटला आहे. पण सत्ताधारी यांनी याबाबत कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर ज्यांच्या हाती राज्य सरकारचे रिमोट आहे त्यांचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच उजनीच्या पाणी लातूरला मिळवून देण्यासाठी विरोध असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. शिवाय आपले मंत्रिपद टिकवून ठेवण्यासाठी येथील पालकमंत्री याबाबत शब्दही काढत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - राज्यात पुन्हा टाळेबंदीचा निर्णय होण्याची शक्यता - अजित पवार
आतापर्यंत लातूरला उजनीचे पाणी केव्हा मिळणार यावरून होत असलेले राजकारण लातूरकरांनी पाहिले आहे. पण संभाजी पाटील- निलंगेकर यांच्या आरोपामुळे एक वेगळेच वळण मिळाले आहे. त्यामुळेच अधिवेशनात सर्व भाजप आमदार यांचे एकच मिशन असेल की उजनीचे पाणी लातूरला मिळवून देण्यासाठी आवाज उठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय केंद्रीय अर्थसंकल्पात राज्याच्या वाटेला काही मिळाले नसल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे.परंतु, शेती, उद्योग, रस्ते यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. शिवाय लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीला 45 कोटी केंद्र सरकारने दिले असल्याचे खा. सुधाकर शृंगारे यांनी सांगितले. केंद्राचा अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी किती भरीव तरतूद आहे तर आगामी राज्य सरकारच्या अधिवेशनात भाजपची भूमिका काय असणार याबाबब लातूरमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी खा. सुधाकर शृंगारे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेश कराड, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - इंधन दरवाढीची परभणीला राज्यात सर्वाधिक झळ; नागरिक संतप्त
विकासाबाबत पालकमंत्री उदासीन
विकास कामाला केंद्राकडून निधी मिळत नसल्याचा ठपका ठेवला जात आहे.पण पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे परिश्रम आणि विकासकामे खेचून आणण्याची क्षमता आहे. उलट मराठवाड्याती एवढेच नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची उदासीनता यामुळेच विकासकामे रखडलेली आहेत. वर्षभरापूर्वी पालकमंत्री अमित देशमुख यांनीच उजनीच्या पाण्याचे आश्वासन दिले होते. पण काळाच्या ओघात त्यांना याचा विसर पडला आहे. त्यामुळे विकास कामाबाबत केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा जिल्ह्याच्या हिताची कामे करून घेणे आवश्यक असल्याचे आ. संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सांगितले आहे.