लातूर - दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघत आहेत. लातूर जिल्ह्यात 900 पेक्षा अधिक गावे, 70 हजाराहून अधिक जनावरे आणि चारा छावणी केवळ एकच, असे चित्र आहे. येथे चारा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असले, तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. या एका छावणीत तब्बल 975 जनावरे दाखल झाले आहेत. अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना या चारा छावणीचा आधार मिळाला आहे.
दिव्यज्योत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या वतीने ही छावणी गेल्या 2 महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळेच जनावरे जगली असून शेतकऱ्यांनाही या छावणीचा मोठा आधार मिळाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असले, तरी शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू केलेली नाही. मात्र, चाऱ्याअभावी जनावरांचे होणारे हाल पाहता दिव्यज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे ही छावणी सुरू केली आहे. दिवसाकाठी 4 हजार कडबा पेंडी, 12 हजार लिटर पाणी आणि राबणारे 20 कर्मचाऱ्यांचे हात यासाठी दिवसाला 70 हजार खर्च होत आहे. यासाठी ना प्रशासनाची मदत ना लोकप्रतिनिधीची, त्यामुळे छावणी चालविणे ही तारेवरची कसरत होत असल्याचे संग्राम नागपूर्णे यांनी सांगितले.
दुष्काळात 2 वेळा या ट्रॅस्टने जनावरांसाठी छावणी सुरू केली होती. मात्र, छावणीत जनावरांची संख्या मोजकी असल्याने खर्च मापक होता. यंदा मात्र स्थिती वेगळी असून 1 हजारांवर जनावरे दाखल झाल्याने खर्चही वाढला आहे. परंतु रखरखत्या उन्हात या छावणीचा आधार जनावरांना मिळाला आहे. किमान आता उर्वरित काळात तरी प्रशासनाने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी छावणी चालकासह शेतकरी करत आहेत. चारा नाही, पाणी नाही अशी स्थिती असतानाही सर्व काही आलबेल असल्याचा दावा प्रशासन करून काय साध्य करणार, हा सवाल कायम आहे.