लातूर - सध्या समाधानकारक पावसाने खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. त्यामुळे बियाणे आणि खतांची मागणी वाढत आहे. विक्रीच्या उद्देशाने गोडाऊनमध्ये साठवूण ठेवलेली तूरडाळ आणि खतांची चोरी झाल्याची घटना एमअआयडीसी परिसरातील गोडाऊनमध्ये घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विष्णूकुमार बन्सीलाल कलंत्री यांचे एमआयडीसी भागात गोडाऊन आहे. यामध्ये त्यांनी तुरडाळीचा साठा केला होता. दरम्यान, ९ जून रोजी त्यांच्या मुलाने सायंकाळी ६ वाजता गोडाऊन बंद केले होते. दुसऱ्या दिवशी विष्णूकुमार गोडाऊनकडे गेले असता त्यांना शटर उचकटले असल्याचे निदर्शनास आले. शिवाय गोडाऊनमधील तूरीचे ५४ कट्टेही चोरीला गेले होते. १ लाख ८९ हजारांची तूरडाळ चोरीला गेल्याची फीर्याद त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे हरंगूळ रेल्वे स्टेशजवळील बसवराज धरणे यांच्या दुकानाच्या शेटरचे नटबोल्ड काढून खताच्या १३० बॅगा लंपास करण्यात आल्या आहेत. बसवराज यांच्या दुकानात कोरामंडल कंपनीचे खत होते. ५० किलोची एक बॅग अशा १ लाख ३० हजाराच्या १३० बॅग चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या खरीप हंगामाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, खत-बियाणांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. चोरी करून विक्रीच्या उद्देशाने चोरट्यांनी खत-बियाणे देखील सोडलेले नाही.