लातूर - दाळ मिलमध्ये काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा दाळीच्या हौदात काम करताना गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरातील एमआयडीसी भागातील महानंद दुध डेअरी लगतच्या बालाजी दाळ मिलमध्ये शनिवारी ही घटना घडली. वैशाली विजय बाजुळगे असे मृत महिलेचे नाव आहे.
वैशाली बाजुळगे या गेल्या दोन वर्षांपासून बालाजी दाळ मिलमध्ये काम करीत होत्या. शनिवारी दुपारी जेवण केल्यानंतर कुसूरभी पठाण ही महिला आणि वैशाली एकाच ठिकाणी कामावर गेल्या. मिलमध्ये असलेल्या दाळीच्या हौदातील पाईप लगत असलेली दाळ ओढण्याचे काम त्या दोन्ही करत होत्या. याच दरम्यान, मशिन सुरू केल्याने त्या दाळीच्या हौदात जाऊ लागल्या. ही बाब कुसरभी पठाण यांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी वैशाली यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशिनचा ओढा अधिक असल्याने वैशाली यांना रोखण्यास त्या अपयशी ठरल्या. त्यांनी इतर कामगारांना मशिन बंद करण्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत वैशाली यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.
हेही वाचा - ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका; रिसोड तालुक्यात 400 हेक्टर शेतीचे नुकसान
मुळच्या औसा तालुक्यातील होळी येथील असलेल्या वैशाली या कुटुंबासमवेत लातूर शहरातील पाच नंबर चौकात राहत होत्या. त्यांच्या पश्चात नवरा, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले आणि इतर पोलीस अधिकारी हजर झाले होते. दाळीच्या हौद इतका मोठा होता की, वैशाली यांना बाहेर काढण्यास पोलीस आणि नागरिकांना तब्बल ५ तासाहून अधिक काळ लागला. पंचनामा करून पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.