निलंगा (लातूर) - जगभरात आज फादर्स डे साजरा होत आहे. वडिलांच्या कष्टाला आणि मेहनतीला ठिकठिकाणी सलाम केला जात असताना राज्यात मात्र, दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अमरावती आणि लातूरमध्ये ऐन फादर्स डेच्या दिवशी जन्मदात्या पित्यावरच हल्ला करून त्यांना संपविण्यात आले आहे.
शेतामध्ये पेरणी करण्यावरून मुलाने आपल्या जन्मदात्या बापाचाच खून केल्याची धक्कादायक केली आहे. पंचाप्पा महाधाप्पा धप्पाधुळे (वय - ६०) असे मृताचे नाव आहे. ही घटना तालुक्यातील भोसलेवाडी येथे घडली.
याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागनाथ पंचाप्पा धप्पाधुळे, महादेवी नागनाथ धप्पाधुळे, अतुल नागनाथ धप्पाधुळे, शिवशंकर नागनाथ धप्पाधुळे, (सर्व रा. भोसलेवाडी) आणि मेहूणा संजय विठ्ठल मुळे (रा. किनी ता. निलंगा) अशी आरोपींची नावे आहेत. हे पाचही जण फरार आहेत.
भोसलेवाडी येथे आज (रविवारी) शेतात पेरणी करण्यावरून मृत पंचाप्पा आणि मुलगा यांच्यात मोठा वाद झाला. यातच त्यांना रॉडने मारहाण केली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. यात आरोपीची पत्नी, दोन मुले आणि मेहूणा यांच्या संगनमताने मारहाण करण्यात आली.
गिरनाथ पंचाप्पा धप्पाधुळे, सविता विरनाथ धप्पाधुळे, कलाबाई पंचाप्पा धप्पाधुळे हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत पंचाप्पा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्व आरोपी फरार आहेत. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल चोरमले हे करत आहेत.
'फादर्स डे'लाच मुलाने केला बापाचा खून; अमरावतीमधल्या मोर्शीतील घटना
एकीकडे देशभरात आज ‘फादर्स डे’ साजरा होत असताना, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड या गावात पिता आणि पुत्राच्या वादात जन्मदात्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक महादेव रवाळे असे पित्याचे नाव असून, मुलाच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मोर्शी पोलिसांनी आरोपी मुलगा प्रशांत रवाळेला अटक केली आहे.
मोर्शी तालुक्यातील हिवरखेड गावात राहणारे अशोक रवाळे यांची मुलगी ही बाळंतपणासाठी माहेरी आली होती. दरम्यान, या मुलीचा आणि पित्याचा वाद सुरू असताना अशोक रवाळे यांनी तिला घराबाहेर निघून जाण्यास सांगितले. तिने हा प्रकार आई व भावास सांगितल्याने वडील व मुलात वाद झाला. अशोक रवाळे यांना डोक्याला जबर मार लागून, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या बाबतची माहिती गावात पसरताच मोर्शी पोलिसांना माहिती देण्यात आली.