लातूर - निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील चढउतार यामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक ना अनेक उपक्रम राबविले जात आहेत. पावसामुळे रब्बीतील पेरण्या रखडल्या म्हणून अल्पावधीत चार पैसे पदरी पडतील म्हणून औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोथिंबीरची लागवड केली. पण दिवसेंदिवस दर कमी होत असल्याने आता धण्यातून तरी उत्पन्न पदरी पडेल अशी आशा त्यांना आहे.
औसा तालुक्यातील भादा, आलमला, भेटा, जायफळ, आंदोरा, कवठा या गावातील शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणामुळे पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या गावच्या शिवारात कोथिंबीरची लागवड करण्यात आली. केवळ 40 दिवसांत कोथिंबीर बाजारात दाखल होते. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी मशागत आणि योग्य जोपासना केली. परंतु, बाजारात जाण्याच्या तोंडावरच कोथिंबीरीचे दर गडगडले आहेत. जुडीला 5 रुपयेदेखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
हेही वाचा - अनोखी संकल्पना: रोहयो मजुरांनी रस्त्याच्या दुतर्फा २ किलोमीटर फुलवली तूर शेती
योग्य दर नसल्याने कोथिंबीर वावरातच असून आता फुलोऱ्यात आली आहे. त्यामुळे विक्री शक्य नाही. अशा अवस्थेत कोथिंबीर काढून बांधावर टाकणे किंवा त्याचे बियाणे तयार करणे हे दोनच पर्याय शेतकऱ्यांजवळ आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात कोथिंबीरीची लागवड झाली आहे. बियाणे म्हणजेच धणे तयार होण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी लागतो. यंदा पाणीही मुबलक प्रमाणात असल्याने जोपासना चांगली झाली आहे. त्यामुळे फुलोऱ्यात आलेली कोथिंबीर जोपासायची आणि याचे धणे करून कोथिंबीरचे बियाणे म्हणून विक्री करण्याचे शेतकऱ्यांनी ठरविले आहे. कोथिंबीरमधून नाहीतर धण्याच्या माध्यमातून का होईना चार पैसे पदरी पडतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. धण्याला 200 ते 250 रुपयांचा दर किलोमागे मिळतो. त्यामुळे तीन लाखांचे उत्पन्न मिळेल, असा आशावाद शेतकरी रमेश लोंढे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - 20 एकरातील पारंपरिक पिकाला, 2 एकरातील पेरू भारी!