लातूर - शेतकऱ्यांना २०१७ ते १८ च्या रब्बी पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, शिरुर अनंतपाळ आणि चाकूर या तालुक्यातील २१ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा आंदोलने करुनही मोबदला मिळाला नसल्याची तक्रार या गावकऱ्यांनी केली आहे.
मागील काही वर्षापासून पाऊस कमी झाल्याने रब्बीची पिके धोक्यात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांचा वीमा बँकेत भरला. पण, लातूर जिल्ह्यातील २१ गावांच्या शेतकऱ्यांना ही रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे हे शेतकरी पीकांना तर मुकलेच, शिवाय त्याची नुकसान भरपाईसुद्धा त्यांना मिळाली नाही. यात शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव, वांजरखेडा, सावरगाव, सुमठाणा आणि डिघोळ तर चाकूर तालुक्यातील १६ गावचे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत.
पीकविमा कंपनीचे कर्मचारी तुमचा समावेश पुढील टप्प्यात होईल, असे सांगतात. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही. विम्याची रक्कम तर दूर, पण अदा केलेली रक्कमही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे बहिष्काराचे हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. निदान मतांसाठी का होईना, प्रशासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देईल अशी त्यांना अपेक्षा आहे.