लातूर - जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक असून तब्बल ४ लाख ५९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. शिवाय वेळोवेळी पावसाने हजेरी लावल्याने पिकाची वाढही चांगल्या पद्धतीने झाली होती. पेरणीनंतर काही ठिकाणी पिकाची उगवण झालेली नाही. काही वाढ झालेल्या सोयाबीनला शेंगाच लागलेल्या नाहीत. शिवणी शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी आहेत.
शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी तर शेतात ट्रॅक्टर फिरवून सोयाबीन मोडले आहे. काढणीचा खर्चही परवडत नसल्याने पाटील यांनी हा निर्णय घेतला. लक्ष्मण येलगट्ट यांनी २ एकरात सोयाबीनची लागवड केली होती. यासाठी त्यांना ४० हजार रुपयांचा खर्च आला तर १ लाख रुपयांचे नुकसान झाले.
हवामानातील बदलाने हा परिणाम झाला की यामागे काही अन्य गोष्टी कारणीभूत आहेत याबद्दल कृषी विद्यापीठाने मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. यंदा सर्व काही सुरळीत असतानाही शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.