लातूर - अवकाळी पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर पिकांची पाहणी करून पंचनामेही झाले. मात्र, ही मदत त्वरित मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. राजकीय पक्ष आणि नेते मंडळी हे सत्ता स्थापनेत व्यग्र आहेत. मात्र, आमचे दुखणे ऐकण्यास त्यांना वेळ नाही. पीक पाहणीचा दिखाऊपणा झाला खरा. परंतु, आता वेळेवर मदत न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा- शबरीमला प्रकरणी पुनर्याचिका आता संविधानिक पीठाकडे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. यंदा परतीच्या पावसानेही अवकृपा केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन हे प्रमुख पीक असून याच पिकाचे पंचनामे अधिक प्रमाणात झाले आहे. जिल्ह्यात 4 लाख 50 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके पाण्यात गेली आहेत. या पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, सत्तास्थापन नसल्याने ही मदत मिळणार की, नाही याबाबत शेतकरी संभ्रम अवस्थेत आहे. परंतु, नुकसानीपोटी प्रशासनाकडे 350 कोटींची मागणी केली असून हा निधी मिळण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. निर्धारित वेळेत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे पूर्ण करून तसा अहवालही पाठविला आहे. मात्र, इतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस कायम राहिल्याने सर्व जिल्ह्यांना एकाच वेळी मदत मिळण्यास थोडा अवधी लागू शकतो अशीही शंका वर्तवण्यात येत आहे.
सततची दुष्काळी परिस्थिती आणि यंदा अवकाळीने केलेली अवकृपा यामुळे रब्बीही धोक्यात आहे. त्यामुळे शासकीय मदतीशिवाय शेती कामे करणे अशक्य असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.