लातूर- रेनापूर मध्यम प्रकल्पातून शेतीसाठी साडेसात दलघमी पाण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. असे असतानाही पाटबंधारे विभागाकडून अंमलबजावणी केले जात नसल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्वरित हक्काचे पाणी सोडावे यासाठी रेनापूर परिसरातील शेतकऱ्यांनी आज लातूर येथील पाटबंधारे विभागात ठिय्या आंदोलन केले.
हेही वाचा- चलनाचे अवमूल्यन! डॉलरच्या तुलनेत २६ पैशांच्या घसरणीनंतर रुपया ७१.८० वर
रेणापूर तालुक्यातील खरोळा बॅरेजमध्ये साडेसात दलघमी पाणी सोडल्यास पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या अनुषंगाने घनसरगाव रेणापूर व खरोळा येथील शेतकऱ्यांनी आतापर्यंत विविध माध्यमातून या पाण्याची मागणी केली आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज या परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
घनसरगाव उच्च पातळी बंधाराच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला या पाण्याचा उपयोग व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंबंधी लेखी आश्वासन असतानाही पूर्तता न केल्याने शेतकर्यांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. परभणी विभागाचे कार्यकारी अभियंता ठोंबरे यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार का रखडणार हा सवाल कायम आहे.