लातूर - हालकी ता. शिरुर अनंतपाळ येथील एक महिन्यापासून बेपत्ता म्हणून पोलीस दफ्तरी नोंद असलेल्या नरासिंग बाबुराव नरवटे या पन्नास वर्षीय मेंढपाळ शेतकऱ्यांचा अखेर खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 21) उघडकीस आला आहे. शरीराचे तुकडे करून पोत्यात भरले व पुरावा नष्ट करण्यासाठी विहिरीत टाकला आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकच खळबळ उडाली असून छिन्न विछिन्न झालेल्या शरिरावरून आरोपीचा शोध लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, नरवटे यांच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मेंढपाळ नरवटे यांचा खून झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मेंढपाळ शेतकरी नरसिंग नरवटे (50) हे एका महिन्यापूर्वी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीच्या गाडीवर आपल्या पत्नीला घराच्या कुलूपाची चावी ठेवल्याचे ठिकाण सांगून गेले होते. मात्र, गाडी चालवणारा कोण होता हे घरच्यांच्या लक्षात आले नाही. पत्नी, मुलगा यांनी त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र दिसून येत नसल्यामुळे अखेर शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडूनही याचा शोध सुरू होता. यामध्ये त्यांच्या संपर्कातील लोकांना बोलावून चौकशी करण्यात आली मात्र शोध लागत नव्हता.
अखेर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांची पत्नी मेंढरे पाण्यासाठी खड्ड्याजवळ घेऊन आली असता, तुटलेला पाय व पोत्यात भरलेल्या शरीराच्या टुकड्याचा उग्र वास येत होता. ही माहिती महिलेने नातेवाईक व गावातील लोकांना व पोलिसांना कळवली. पोलीस निरीक्षक कदम हे संपूर्ण ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. मुंडकेही शरीरावेगळे केले होते. अखेर पोलीस आधिकाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या कानावर घातली. यानंतर मेंढपाळ शेतकऱ्याची क्रूर हत्या झाली असल्याची बाब उघडकीस आली.
दरम्यान, मृतदेह पूर्ण सडून गेला असल्याने त्यांचा तपास करून गुन्हेगार उघडकीस आणणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यापूर्वी गावात काही लोकांसोबत अनेक वाद असाल्यामुळे हा खून विश्वासात घेऊन अथवा सुपारी देऊन केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस परिसरातील हालकी, गणेशवाडी, या भागात पथक पाठवून आरोपींची माहिती घेत असल्याचे समजते. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.