लातूर - जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रोकडा सावरगावात शेतीला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामध्ये फळपिकांसह शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
रोकडा सावरगाव येथील उमाकांत संतराम बेल्लाळे यांच्या शेतात अचानक आग लागली होती. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बेल्लाळे यांच्या शेतीमधील ऊस, हळद, आंबा आदी फळझाडे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच ठिबक साहित्य व स्प्रिंकलर साहित्य जळून राख झाले आहे.
भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे. आता उभी पिके डोळ्यासमोर जळून भस्मसात झाली. यावेळी शेतकऱ्यांची लहान मुले देखील मिळेल तिथून पाणी आणत पिके वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या २ दिवसापासून जिल्ह्यात आगीच्या घटना घडत आहे. बुधवारीही औसा तालुक्यात आगीमुळे पशुधन जखमी झाले होते.