लातूर - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतासह राज्यातही कोरोनाचे 11 रुग्ण आढळल्याने नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. याबाबत अनेक अफवा सोशल मीडियातून पसरवल्या जात आहेत. चिकन खाल्ल्याने कोरोना होता, अशी अफवा पसरवली जात आहे. त्यातच आता लातुरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याचा एक मॅसेज फिरत आहे. त्यामुळे अफवा पसरवली तर थेट गुन्हा दाखल केला जाणार, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- नाथाभाऊंसाठी पक्षाने वेगळा प्लॅन आखला असेल - पंकजा मुंडे
कोरोना व्हायरस बद्दल दिवसेंदिवस वेगवेगळ्या अफवा समोर येत आहेत. यापूर्वी कोरोना हा चिकन खाल्ल्याने होतो. असा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच 7 रुपयांनाही कोंबडी विकण्याची तयारी पोल्ट्री व्यावसायिकांनी दाखवली. असे असतानाही खवय्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून कोरोना व्हायरस झालेली एक महिला शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्याही घटली असल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र असा कोणताही प्रकार नाही. ही अफवा आहे. प्रत्यक्षात मात्र, संशयित रुग्ण देखील रुग्णालयात दाखल नाही. तर ओपीडीची संख्या कायम असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.