लातूर - कोरोनाचे संकट टळत असतानाच आता बर्ड फ्लूसारख्या रोगाचा सामना व्यावसायिकांना करावा लागत आहे. आठ दिवसांपूर्वी अहमदपूर तालुक्यातील तब्बल 300 कोंबड्या या बर्ड फ्लूने दगावल्या होत्या तर आता औसा तालुक्यातील 280 व उदगीर तालुक्यातील 11 कोंबड्या ह्या दगवल्या आहेत.
10 रुपयाला कोंबडी विकण्याची आली होती वेळ
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आता कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीला या कुक्कुटपालनाने मोठा आधार मिळाला होता. पण गेल्या एका वर्षात दोनवेळा भीषण संकटाचा सामना पशुपालकांना करावा लागला आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना होता या एका अफवेमुळे 10 रुपयाला कोंबडी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. आता यामधून व्यावसायिक सावरत असतानाच बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे.
इतर कोंबड्या करण्यात आल्या नष्ट
प्रथम अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे बर्ड फ्लूमुळे कोंबड्या दगवल्या तर आता औसा तालुक्यातील खुर्दवाडी येथील 280 व उदगीर तालुक्यातील सुकणी येथील 11 कोंबड्या दगवल्या आहेत. एवढेच नाही तर याचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून इतर कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. प्रादुर्भाव वाढू नये शिवाय यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 10 समितीच्या नेमणूक करण्यात आली आहे. 30 पथकेही कार्यन्वित आहेत. असे असताना बर्डफ्लूचा धोका वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस व्यावसायीक यांच्यामध्ये भीती निर्माण होत आहे.
जोड व्यवसायाला फटका
गेल्या वर्षभरापासून व्यावसायिक अडचणीत आहेत. कोरोनाचा धोका टळत असताना आता बर्ड फ्लूचा विळखा वाढत आहे. अहमदपूरनंतर आता औसा आणि उदगीर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. 60 टक्क्यांनी दर कोसळले असून ग्राहकांनाही पाठ फिरवली आहे. त्यामुळे उत्पादन घेणे बंद करण्यात आले आहे.