लातूर- निलंगा तालुक्यातील बुजकरुवाडी गावात केवळ रोहीत्रचे (डिपी) वायर जळाल्यामुळे चार दिवसापासून गाव अंधारात आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना विहीर शोधत भटकंती करावी लागत आहे. विद्युत उपकरणे बंद पडल्याने दैनंदिन गरजा भागवणेही कठीण झाले आहे.
हेही वाचा- 'शरद पवारांनीही पक्ष बदलला मग त्यांचाही बाप काढणार का?'
बुजरुकवाडी हे 150 उंबरठ्याचे गाव आहे. या गावाला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र गावाच्या शेजारीच आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे या रोहित्राचे वायर चार दिवसांपूर्वी जळाले आहे. त्यामुळे चार दिवस झाले गाव अंधारात आहे. गावचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. सगळी विद्युत उपकरणे ठप्प पडली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
गावचे सरपंच दिनकर पाटील यांनी संबंधित कार्यालयाला फोन करुन माहिती दिली. मात्र, कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. निटूर महावितरण कार्यालयातील अभियंत्यालाही याप्रकरणी माहिती देण्यात आली. मात्र, अद्याप पर्यंत काहीच उपाययोजना झालेली नाही.
बुजरुकवाडी गावामध्ये सिंगल फेज रोहित्र बसवले आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून त्याही बंद असल्याने गावाला सिंगल फेजची विजही मिळत नाही. त्यामुळे या कारभाराला पायबंद घालून दोशी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.