लातूर- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अधिक आहे. गुरुवारी लातूर जिल्ह्यात 8 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नामुन्यांपैकी 5 जणांचे तर उदगीर येथील 3 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 36 वर गेली आहे.
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. बुधवारी 6 नव्या रुग्णांची भर पडल्यानंतर गुरुवारी 8 रुग्ण वाढले आहेत. 8 पैकी 2 रुग्ण लातूर शहर, 1 बाभळगाव, 4 उदगीर तर उस्मानाबाद जिल्ह्यातून रेफरहुन आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. लातूर मधून 64 तर उदगीर सामान्य रुग्णालयातून 48 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी दाखल झाले होते.
आतापर्यंत 128 व्यक्तींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 36 जणांवर उपचार सुरू असून कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर मनपा हद्दीतही रुग्णांची संख्या वाढत आहे.
परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात आटोक्यात असलेला आकडा आता पुन्हा वाढू लागला आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांचा परिसर सील करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना मनपाचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा घरपोच देत आहेत.
परजिल्ह्यातून नागरिक जिल्ह्यात आले तरी त्यांनी स्वतःहून आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.