लातूर - जिल्ह्यात पर्यायाने लातूर शहरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उदगीर पाठोपाठ लातूर शहरात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. या दोन मुख्य शहरातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसत असून जिल्ह्यात रविवार पर्यंत 69 रुग्णांवर उपचार सुरू होते तर आतापर्यंत 65 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. लातूर शहरातील 6 ठिकाणे सील करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा घरपोच दिल्या जात आहे.
मनपा हद्दीमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती. मात्र, लेबर कॉलनीत पहिला रुग्ण आढळून आला होता आणि आता शहराच्या चोहीबाजूने कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. शहरातील लेबर कॉलनी, एमआयडीसीमधील हाडको कॉलनी, मोती नगर, संभाजी नगर, देसाई नगर, जिजामाता नगर हा परिसर सील करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देखील मनपाचे कर्मचारी पुरवत असून संशयीत व्यक्तींची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.
90 हजारांहून अधिक नागरिक जिल्ह्यात दाखल
मोती नगर भागात राहणाऱ्या एका आडत व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर संपर्कात आलेल्या घरातील 9 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय 3 जून पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील बंद ठेवण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने दिवसागणिक रुग्णांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. परजिल्ह्यातून आतपर्यंत 90 हजारांहून अधिक नागरिक जिल्ह्यात दाखल झाले असून आरोग्य तपासणी करूनच त्यांनी घरात प्रवेश करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनच्या नियमात काय बदल केले जातील का? हे देखील पाहावे लागणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शहराच्या चोहीबाजूने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.