लातूर- २०१६ साली रेल्वेमार्फत शहराला पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यासंबंधीचे रेल्वेचे बिल महानगरपालिका प्रशासनाकडे देण्यात आले असल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तिजोरीत खडखडाट असताना शहर मनपा हे बिल कसे अदा करणार, की ते नागरिकांकडूनच घेतले जाणार, असे अनेक सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, शहर नागरिक आणि मनपा या दोघांवरही या बिलाचे ओझे पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. सदरील बिल आपत्ती व्यवस्थापनाकडून भरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
२०१६ साली भीषण दुष्काळामुळे शहराला मिरजेहून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. टंचाईच्या काळात तब्बल रेल्वेच्या १११ फेऱ्या करण्यात आल्या होत्या. यापोटी ११ कोटी ८० लाखाचे बिल आकारण्यात आले होते. त्यापैकी १ कोटी ९० लाख रुपये स्वयंसेवी संस्थेने देऊ केले होते. उर्वरित ९ कोटी ९० लाखाचे बिल रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी लातूर जिल्हा प्रशासनाकडे पाठविले. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
भीषण दुष्काळामुळे यंदाही रेल्वेच्या मदतीची गरज लातूरकरांना लागणार अशी स्थिती आहे. तशी तयारीही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. शिवाय लातूर महानगरपालिका आर्थिक संकटात असताना हे बिल कसे अदा केले जाणार तसेच आगामी काळात रेल्वेने पाणी आणण्याची नामुष्की ओढवली तर मंजुरी मिळणार का, असे अनेक सवाल लातूरकरांच्या मनात होते. मात्र, या बिलाचा भार लातूरकरांवर पडणार नसल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. सदरील बिल आपत्ती व्यवस्थापनाकडून भरले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा परिणाम आगामी काळात रेल्वे सुरू करण्यावर होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.