लातूर - शेतकऱ्यांच्या बांधावर आल्यावर नुकसानीची काय स्थिती आहे हे लक्षात येते. केवळ पिकाचेच नाही तर शेतजमिनही वाहून गेली आहे. हे न भरून निघणारे नुकसान आहे. सत्ताधाऱ्यांनी पाहणी तर केली परंतु, प्रत्यक्षात मदतीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. केंद्र सरकारशी मुख्यमंत्री यांचे बोलणे झाले आहे, पण यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या घोषणांची तरी पूर्तता करावी. एकरी पन्नास हजार रुपये दिले तरच शेतकरी या संकटातून सावरणार आहे. त्यामुळे पाहणी बरोबरच दिलासा देणेही आवश्यक असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मंगळवारी औसा तालुक्यातील बुधोडा, चिंचोळी शिवारातील पिकांची पाहणी करीत असताना त्यांनी हे सरकारला आवाहन केले आहे.
हेही वाचा - महिला विशेष : नागपुरातील 'रेड लाइट एरिया' सात महिन्यांपासून 'कोरोना फ्री'
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान पाहणीसाठी नेत्यांची रीघ आहे. मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाहणी केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिकांची पाहणी करून बुधोडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. धावत्या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारवर टीका केलीच पण आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना झालेल्या अतिवृष्टी दरम्यान 10 हजार कोटींची मदत जाहीर केल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे. परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जे एकरी 50 हजार मदतीचे आश्वासन दिले होते ते आता पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. केवळ पाहणी दौरे करून नाही तर त्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडणे आवश्यक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केवळ केंद्र सरकार मदत करीत नाही हे कारण समोर करून राज्य सरकार आपले अपयश लपवत आहे. कर्ज काढणे काही गैर नाही. आतापर्यंत अनेक राज्यांनी अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र, राज्य सरकारची इच्छाशक्तीच नसल्याने मदतीबाबत आश्वस्त केले जात नाही. आज नुकसान होऊन पाच दिवस उलटले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पंचनामेही झाले नाहीत. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत किती गंभीर आहे हे लक्षात येते. वेळेतच मदत होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारशी मुख्यमंत्री यांचे याबाबत बोलणेही झाले आहे. पण जबाबदारी झटकून चालणार नाही रब्बीच्या आणि सणाच्या तोंडावर मदत मिळणे आवश्यक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.