लातूर- लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे नारिकांनी रस्त्यावर गर्दी केल्याचे पहायला मिळाळे. त्यामुळे गुरुवार पासून नवी नियमावली जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या उद्योग, व्यावसायिकांसाठी दोन दिवस ठरवून देण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी शहरातील मुख्य रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कायम आहे.
हेही वाचा- Top 10 @ 10 AM : सकाळी दहाच्या १० ठळक बातम्या; वाचा एका क्लिकवर..
शहरात अत्यावश्यक सेवा पूर्वीपासूनच सुरू आहेत. मात्र, 4 मे नंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन काही दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नागरिकांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. तर सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत उद्योग व्यवसायांना सूट कायम ठेवली होती.
आता मात्र, यामध्येही कपात करण्यात आली असून इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, टायर्स, बॅटरी, रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉपी ही दुकाने सोमवार आणि मंगळवारी सुरू राहणार आहेत. तर रेडिमेड कापड, भांडी, टेलरिंग, फुवेअर, जनरल स्टोअर्स, बॅग हाऊस ही दुकाने बुधवार-गुरुवार खुली राहणार आहेत. तर शुक्रवार-शनिवारी स्टेशनरी, कटलरी, स्टील ट्रेडर्स, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल यांना सवलत देण्यात आली आहे. कृषी संबंधित बी- बियाणे, औषध फवारणी ही दुकाने रविवार वगळता सुरू राहणार आहेत. आशा प्रकारे सूट देण्यात आली असली तरी दुकाने सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
नियमावली ठरवूनही त्याचे पालन होताना दिसत नाही. काही व्यावसायिकांनी नियमांना बगल देत दुकाने चालूच ठेवली आहेत. तर बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ कायम आहे. त्यामुळे केवळ घोषणा न करता नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही 21 वर पोहचली आहे. त्यामुळे उदगीर रेडझोनमध्ये असून 13 मे पर्यंत शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.