लातूर - लातूर लोकसभा मतदार संघातील उमेदवाराला विजयाचे प्रमाणपत्र देण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडली. त्यामुळे कंटाळलेल्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळेल त्या जागी आराम करण्यावर भर दिला. रात्री ११ पर्यंत निकाल लागेल या अपेक्षेने उमेदवार सुधाकर शृंगारे हे कार्यकर्त्यांसमवेत दाखल झाले होते. मात्र मतमोजणीतील दिरंगाईमुळे त्यांना ताटकळत बसावे लागले.
मतमोजणीच्या सुरवातीपासूनच येथील निकाल प्रक्रिया रखडलेली होती. गुरुवारी रात्री शहरातील मतमोजणी सुरू असताना अनेक वेळा अडचणी आल्याने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनाच हस्तक्षेप करावा लागला होता. आकडेवारीची जुळवाजुळव करताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. तर प्रमाणपत्राची वाट पाहत अनेकांनी डुलक्या घेतल्या. यामध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू व अरविंद पाटील, जि. प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे या लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट असताना प्रमाणपत्र घेण्यासाठी मात्र सर्वांनाच ताटकळत बसावे लागले होते.
अखेर जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी अहवाल घेऊन कुठे त्रुटी आहे हे शोधून काढले आणि पहाटे ३: ३० वाजता सुधाकर शृंगारे यांना प्रमाणपत्र देण्यात आले.