लातूर - महिन्याभरापूर्वी दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या साहित्य वाटपाचा कार्यक्रम ऑनलाईन पार पडला. पण हे साहित्य वाटप श्रेयवादाच्या लढाईत अडकल्याने अद्याप दिव्यांगांना मिळालेले नाही. या साहित्याची त्यांना गरज असताना देखील, साहित्य वाटप होत नसल्याने त्यांची हेळसांड सुरू आहे.
दिव्यांगांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी औसा पंचायत समितीकडे शेकडो तीनचाकी सायकली आल्या आहेत. पण याचे वाटप कुणाच्या हस्ते करायचे यावरून अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे 10 महिन्यांपूर्वी आलेल्या या तीनचाकी सायकली या गोडावूनमध्ये तशाच धूळखात पडून आहेत. केवळ औसा तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमध्ये देखील अशीच अवस्था आहे. औसा पंचायत समितीकडे 10 महिन्यांपूर्वी हे साहित्य आले आहे. मात्र अद्याप या साहित्याचे वाटप करण्यात आलेले नाही. साहित्य वाटपासाठी असलेली औपचारीकता दिव्यांगांकडून पूर्ण करून घेण्यात आली आहे. मात्र साहित्याचे वाटप झाले नाही. साहित्य मिळवण्यासाठी दिव्यांग दररोज पंचायत समितीमध्ये चक्रा मारत आहेत. या साहित्याचे कधी वापट होणार, साहित्य वाटपासाठी इतका विलंब का लगत आहे? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
श्रेयवादाचे राजकारण करू नये
दहा महिन्यांपूर्वी औसा पंचायत समितीकडे लाखो रुपयांचे साहित्य आले आहे. मात्र हे साहित्य श्रेयवादामध्ये अडकले आहे. कोणाच्या हस्ते या साहित्याचे वाटप करायचे ते ठरत नसल्याने साहित्य पंचायत समितीमध्ये धूळ खात पडून आहे. ही दिव्यांगांची थट्टा असून, पंचाय समितीने श्रेयवादात न अडकता तातडीने साहित्याचे वाटप करावे, अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती रेखा नगराळे यांनी केली आहे.
विनंती करूनही साहित्य वाटप होत नाही
साहित्याचे वाटप व्हावे म्हणून अनेकवेळा पंचायत समितीमध्ये खेटे मारले आहेत. मात्र, कोणीच मनावर घेत नसल्याने, परवड ही सुरूच आहे. वाटप कुणाच्या हस्ते व्हावे याची औपचारिकता बाजूला ठेऊन, लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप व्हावे अशी मागणी मिनहाज शेख यांनी केली आहे.