लातूर - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात देखील अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला होता. आता रब्बीची पिके जोमात असतानाच गुरुवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिह्यात यंदा हरभरा पिकाचा विक्रम पेरा झाला होता. पीक अंतिम टप्प्यात असताना पावसाने हजेरी लावल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.
ज्वारीची पडझड तर द्राक्ष, आंब्याचेही नुकसान
खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकावर भर दिला होता. सर्व काही वेळेत झाल्याने आता भरघोस उत्पादन होणार असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत होते. मात्र, एका रात्रीत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्वारीची पडझड झाली आहे तर द्राक्ष, आंबा या फळबागांचे नुकसान झाले आहे.
3 लाख 27 हजार हेक्टरवर रब्बीचा पेरा
जिल्ह्यात रब्बीचा पेरा 3 लाख 27 हजार हेक्टरवर झाला होता. रब्बीतील प्रमुख पीक हे हरभरा असून तब्बल 2 लाख 28 हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, खरिपातील सोयाबीन प्रमाणेच हरभरा हे पीक अंतिम टप्प्यात असताना पावसाने हजेरी लावली आणि होत्याचे नव्हते झाले.