लातूर - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत संशयित रुग्ण किंवा कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. मात्र, शासकीय यंत्रणेकडून याबाबत जनजागृतीही केली जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कोरोना रोग माहिती असला तरी यापासून दूर राहण्यासाठी नेमके काय करायचे याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. लातूर बसस्थानक परिसरातील स्थिती....
कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एक दिवसाआड जिल्हा प्रशासनाच्या बैठका पार पडत आहेत. कोरोनापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेली माहिती शहरातल्या विशिष्ट घटकापर्यंतच पोहचलेली आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी सूचना, माहिती किंवा कोणती शासकीय यंत्रणा राबत नसल्याचे चित्र लातुर जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. सध्या जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त किंवा संशयित रुग्ण नाही. मात्र, पुणे-मुबंई याठिकाणी प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी आपले गाव जवळ करण्याची घाई सुरू केली आहे. त्यामुळे येथील बसस्थानकात हजारोच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. या ठिकाणी मात्र, सूचना किंवा यापासून घ्यावयाची काळजी याच्या माहितीचे बॅनर किंवा प्रशासकीय अधिकारी माहिती देताना पहावयास मिळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रादुर्भाव होण्यापूर्वीच यंत्रणा सशक्त असणे आवश्यक आहे. सर्वसामान्य जनतेने मात्र काही नियम स्वतः वरच लागू केले आहेत.
प्रशासकीय यंत्रणेनेही ग्रामीण भागात लक्ष देणे गरजेचे झाले आहे.