लातूर - सध्या कोरोनाच्या धास्तीने प्रत्येक जण गाव जवळ करीत आहे. याप्रमाणेच लातुरात वास्तव्यास असलेले देशमुख कुटुंब चार दिवसांपूर्वी बोरगांव (नाव्हेली) या मूळ गावी गेले. मात्र, मंगळवारी रात्री चोरट्यांनी घरात हात साफ केला आणि रोख रकमेसह २५ तोळे सोने लंपास केले.
कोरोनाने सध्या थैमान घातले आहे. लातूर जिल्ह्यात एकही रुग्ण नसला तरी याची धास्ती सर्वत्र पसरलेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक आता गाव जवळ करीत आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्याहून तब्बल २५ हजारांहून अधिक नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. याप्रमाणेच लातुरात वास्तव्यास असलेले विजयकुमार हे आपल्या कुटुंबाला घेऊन औसा तालुक्यातील बोरगांव (नाव्हेली) येथे गेले होते. मंगळवारी रात्री सर्व गावकरी झोपेत असताना अज्ञातांनी देशमुख यांच्या घरात प्रवेश केला आणि ७ हजार रुपये रोख व २५ तोळे सोने लंपास केले आहे.
सकाळी हा सर्व प्रकार विजयकुमार यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे कोरोनाची धास्ती आणि होणारे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. खेडेगावात नागरिकांची गर्दी होत आहे, तर शहरे ओस पडत आहेत. याचाच गैरफायदा आता चोरटे घेऊ लागले आहेत.
दरम्यान, भादा पोलीस श्वान पथकासह बोरगांवात दाखल झाले. संशयितांचे फिंगरप्रिन्ट घेतले असून विजयकुमार यांच्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.