लातूर- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा सर्व क्षेत्रांवर परिणाम होत आहे. विदेशातील आयात, निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे टोमॅटो पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. काढणीला आलेले टोमॅटो विक्री बंद झाल्याने, शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत.
हेही वाचा- जाणून घ्या जगभरातील महत्त्वाच्या दहा घडामोडी...
बाजारात एकीकडे टोमॅटोची आवक वाढली असतानाच दुसरीकडे कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे टोमॅटोची निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे वैशाली, विरान जातीच्या टोमॅटोचे फड वावरातच पडून आहेत. मागणीच नसल्याने टोमॅटो जनावरांना टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
कधी निसर्गाच्या अवकृपेने, तर कधी बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. त्यातच आता कोरोना विषाणूचा परिणाम देखील शेतीमालावर होऊ लागला आहे. यापूर्वी सोयाबीनचे दर घटले तर आता टोमॅटो वावरातूनही काढण्यास व्यापारी धजवेना झालेत. एकरभर टोमॅटोला जोपासण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. उत्पादनाच्या आशेवर तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले टोमॅटो आता चक्क जनावरांना टाकावे लागत आहेत.
1रुपया किलोप्रमाणे दर मिळत असल्याने टोमॅटोची काढणीही न परवडणारी आहे. त्यामुळे हडोळती येथील विश्वनाथ हेंगणे यांनी दोन एकराच्या फडात जनावरे सोडली आहेत. वैशाली वाणाचे टोमॅटोची विदेशात निर्यात होते. मात्र, सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने निर्यात बंद आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. इतर पिकांप्रमाणे आता टोमॅटोचीही नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.