लातूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची जोरदार चर्चा होत असली तरी लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण घटत आहेत. दीड महिन्यांपूर्वी जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 3 हजारावर गेली होती परंतु, सद्यस्थितीत केवळ 550 रुग्ण हे उपचार घेत आहे. शिवाय जळकोट येथील कोविड सेंटर तर जिल्ह्यातील 11 सेंटर हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्यात निलंगा तालुक्यात पहिला रुग्ण आढळला होता. तर 26 मे रोजी उदगीर येथे एका वयोवृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतच गेली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 20 हजार 527 रुग्ण आढळले आहेत. पैकी 19 हजार 355 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाली होती. दिवसाकाठी 300 ते 350 रुग्ण वाढत होते. त्यामुळे लातूर शहरात 7 तपासणी केंद्र सुरू करण्यात आली होती. तर तालुक्याच्या ठिकाणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्ट केली जात होती. 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या ही वाढतच होती. त्यामुळे गेल्या 6 महिन्यात लातूर जिल्ह्यात 622 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून रुग्ण संख्या झपाट्याने घटत आहे. दिवसाकाठी 350 वर गेलेला रुग्णाचा आकडा दोन अंकी झाला आहे. एका दिवसात सर्वात कमी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी केवळ 29 रुग्ण आढळून आले होते.
तपासणी केंद्राकडे रुग्णांची पाठ
काळाच्या ओघात तपासणी करून घेणाऱ्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. लातूर शहरात 7 ठिकाणी टेस्ट केल्या जात होत्या. सध्या केवळ दोन ठिकाणी टेस्ट केल्या जात असूनही या केंद्रावरही दिवसाकाठी केवळ 60 ते 70 नागरिक येत आहेत. हीच अवस्था जिल्ह्यातील तपासणी केंद्राची आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत तपासणी केली जात आहे.
रुग्णसंख्या कमी पण धोका कायम
रुग्णसंख्या घटत असली संपूर्णपणे धोका टळलेला नाही. त्यामुळे लक्षणे आढळताच नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलेले आहे. पण नागरिक तापसणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.