लातूर - रेडिरेकनरप्रमाणे मनपाने केलेली भाडेवाढ ही येथील व्यापाऱ्यांना मान्य नाही. मनपाने मनमानी कारभार करून ही वाढ केली आहे, असा आरोप करत काँग्रेस व स्थानिक व्यापाऱ्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. अवाजवी मालमत्ता कर, वाढीव गाळे भाडे रद्द करून पूर्वीप्रमाणेच दर आकारण्यात यावेत, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शासकीय धोरणावरून मनपाने रेडिरेकणरप्रमाणे येथील गाळे धारकांना दर आकारण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने मनपा प्रशासनाने नोटीसही बजावली आहे. मात्र, ही दरवाढ मान्य नसल्याचा पवित्रा घेत आज गंजगोलाई, मिनी मार्केट, गांधी चौक, मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. गंजगोलाई ते मनपादरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात मनपाचा कारभार अंधाधुंदी असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शहरात मनपाचे ११२७ गाळे आहेत. पैकी २८ रिकामे असून 607 गाळ्यांचा करारनामा संपला आहे. २५३ गाळ्यांचे कारारनामेच झालेले नाहीत. त्यामुळे मनपाला मोठी आर्थिक झळ बसत असून बदललेल्या नियमांची अंमलबजावणी केल्याने अधिकची दरवाढ झाली आहे. मात्र, यामागे सत्ताधाऱ्यांकडून राजकारण होत असून व्यापाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न मनपा पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे ही लादलेली दर वाढ मान्य नसून याची अंमलबजावणी केली जाणार नसल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.
काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गंजगोलाई येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा मनपाच्या परिसरात दाखल झाल्यानंतर अमित देशमुख यांची सभा झाली. यावेळी व्यापाऱ्यांच्या मागण्यांबरोबर जिल्ह्यातील दुष्काळ व इतर प्रश्नावरून त्यांनी सरकारवर टीकेची झोड उडवून दिली. नवीन मालमत्ता कराची सक्ती केल्यास आंदोलन कायम राहणार असल्याचा इशारा यावेळी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व सर्व व्यापारी बंद पाळून मोर्चात सहभागी झाले होते. मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.