लातूर - मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्यांवर गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू आहे. असे असताना आज (दि. 3 एप्रिल) सकाळी घराबाहेर पडून मॉर्निंग वॉक करणारे तब्बल 80 जण थेट पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. काल 'मी लातूरचा दुश्मन, मला लातूरकरांची चिंता नाही' अशाप्रकारे फलक हातात देऊन बाहेर फिरणाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. तरीही आज नागरिक घराबाहेर पडले होते. विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात सर्वांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रीचा दिवस करीत आहे. असे असतानाही संचारबंदीच्या नियमांचे पालन केले जात नाही. दोन दिवसांमध्ये एमआयडीसी आणि शिवाजी नगर ठाण्यात तब्बल 150 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. असे असताना आज विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीतील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी पोलीस निरीक्षक विकास तिडके यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 78 जणांना ताब्यात घेतले आहे.
यांच्यावर 188, 269, 270 या कलाम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुदैवाने लातुरात एकही कोरोनाग्रस्त नाही. मात्र, नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असताना अशाप्रकारे दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस यंत्रणा कडक धोरण अवलंबित असली तरी लातूरकरांनी त्यांना साथ देणे गरजेचे झाले आहे.
हेही वाचा - 'मॉर्निंग वॉक'ला निघाले अन् पोलीस ठाण्यात पोहोचले, लातुरात 120 जणांविरोधात गुन्हा