लातूर - लग्नाला चार वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने सासरच्यांनी आपल्या बहिणीला जीवे मारले आणि तिचा मृतदेह घराच्या छताला लटकवला , असा खळबळजनक आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे. मात्र, याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
उदगीर तालुक्यातील मधुमती यांचा चार वर्षांपूर्वी दावणगाव येथील उमाकांत फुले यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, 'लग्न होऊन चार वर्षे झाली, तुला मूल होत नाहीत. तू वांझ आहेस, स्वता:च आत्महत्या कर, असे म्हणत सासरच्यांकडून मधुमतीचा छळ केला जात होता, असा आरोप विवाहितेच्या भावाने केला आहे. शिवाय पती, सासू, सासरे आणि नंदाही तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होत्या. यामुळे काही दिवसांपूर्वी मधुमती माहेरी आली होती. मात्र, पुन्हा समजूत काढत ती सासरी गेली. पण, तरीही तिला त्रास देणे सुरूच होते. अखेर, आज सासरच्या मंडळींनी तिला जीवे मारले, असा आरोप तिच्या भावाने केला आहे.
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.