लातूर - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात बुधवारी स्थगिती देण्यात आली. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले असून पुढील करावाईसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी बैठका होऊ लागल्या आहेत. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने निराश झालेल्या व गेल्या अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या किशोर कदम या तरुणाने चाकूर तहसील कार्यालयासमोर विषारी द्रव प्राशनकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील तरुण किशोर गिरीधर कदम (वय 28) हा गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्याने तलाठी आणि पीएमटी यासाठी परीक्षाही दिली होती. अभ्यासासोबतच आरक्षण मिळाल्यास त्याचा आपल्याला लाभ मिळेल असा आशावाद त्याला होता. आरक्षणाला स्थिगिती देण्यात आल्याने त्याची निराशा झाली. त्याने सोशल मीडियावरून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले व चाकूर तहसील कार्यालयासमोर विषारी द्रव प्राशन केले. चाकूर ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले व पुढील उपचारासाठी लातूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. किशोर याचे बीएड पूर्ण झाले असून गेल्या काही वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.
दरम्यान, काल मराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले. न्यायमूर्ती एल. नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मात्र, त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीही दिली आहे.