लातूर - अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी शिवारातील एका पाझर तलावात चक्क हातबॉम्ब आढळून आला आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, हा बॉम्ब पाहाण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दुपारी 3 च्या सुमारास काही ग्रामस्थांना हा बॉम्ब आढळून आला. ग्रामस्थांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल
अहमदपूर-नांदेड मार्गावरील सातत्याने वर्दळ असलेल्या महादेववाडी शिवारात शनिवारी दुपारी पाझर तलावात एक हातबॉम्ब आढळून आला आहे. काही गुराखी जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेले असता त्यांना हा बॉम्ब आढळून आला. या घटनेची माहिती तुकाराम ज्ञानोबा वलसे यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हा बॉम्ब ताब्यात घेतला. हा जुन्या प्रकारातला बॉम्ब असून, घटनास्थळी एकच बॉम्ब सापडल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी दिली आहे. दरम्यान बॉम्ब निकामी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागतात, मात्र उशीरापर्यंत हा बॉम्ब निकामी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाले नव्हते.