लातूर - महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, शेतकरी आणि समाजातील विविध घटकांचे प्रश्न आद्यपही कायम आहेत. मराठा आरक्षणाला स्थगिती ही राज्य सरकारच्या उदासीनतेमुळेच मिळाली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.
विविध प्रश्न घेऊन आज शहरातील महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हा आरोप केला. कोरोनाची महामारी यातच राज्य सरकारची धोरणे, यामुळे जनता त्रस्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना ऑक्सिजन आणि औषध पुरवठा करण्यास सरकार असमर्थ आहे. या संकटाचा सामना करीत असताना अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त आहे. यामुळे राज्यकर्त्यांवर ३०२चा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.
सरकार स्थापन होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, जिल्ह्यात दोन मंत्री असतानाही एकही विकासाचे काम जिल्ह्यात झालेले नाही. शिवाय वाढती रुग्णसंख्या आणि शेतकऱ्यांची परस्थिती अधिकच बिकट होत आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे, हातातोंडाशी आलेला सोयाबीनचा घास हिरावला आहे. असे असताना पंचनामे करण्यास आद्यपही सुरुवात झालेली नाही. या सर्व बाबींचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असून सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच, आज भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा- मराठा आरक्षण : आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन