निलंगा (लातूर)- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर समतानायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती सार्वजनिकरित्या मोठ्या स्वरूपात साजरी न करता प्रातिनिधिक स्वरूपात व घराघरात उत्साहात साजरी करण्यात आली. बसवेश्वर जयंती उत्सवाच्या निमित्ताने अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले .
संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी व जमावबंदीची घोषणा करून सर्वांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या व प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व बसवेश्वरप्रेमी नागरिकांनी जयंती उत्सवाचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून केवळ प्रातिनिधिक स्वरूपात व घराघरात बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी केली. घरोघरी इष्टलिंग योगसाधना व महात्मा बसवेश्वर वचन साहित्यांचे वाचन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
बसवेश्वर मंदिर पेठ, महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय अनुभव मंडप बसवेश्वर नगर. निलंगा व बसवेश्वर चौक येथे प्रातिनिधिक स्वरूपात बसव जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या कायक व दासोह सिद्धांताचा विचार लक्षात घेऊन कोराेना विरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या शासकीय उपजिल्हा रुग्णालय निलंगा, पोलीस दल निलंगा, नगरपरिषद कार्यालय, तहसील कार्यालय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच सफाई कामगार यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
टाळेबंदीमुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असल्याने यावर्षी फेसबूक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध उपक्रमाचे आयोजन करून बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.