लातूर - दिवसेंदिवस टाळेबंदीमध्ये शिथिलता येत असून आता 50 नागरिकांच्या उपस्थितीत लग्नाला देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याच सोहळ्याशी संबंधित असलेल्या बँड-बाजा वाद्याला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे बॅन्जो ग्रुपच्या मालकांसह कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यंदाच्या हंगामात सनई वाजलीच नसल्याने जिल्ह्यातील 10 ते 15 हजार कारागिर अडचणीत आले आहेत.
लग्नसराईच्या सुरवातीला अनेकांनी तारखा बुकिंगही केल्या होत्या. पण, टाळेबंदीमुळे एकाही लग्नात ना डिजेचा आवाज, ना सनईचा आवाज घुमला. उलट एडव्हान्स पोटी घेतलेली रक्कम परत करण्याची पाळी या ग्रुपवर ओढावली. वर्षातून दोन हंगाम त्यात कोरोनाचे विघ्न त्यामुळे आता जगावे कसे, असा प्रश्न यांच्यासमोर आहे. लातूर शहरातील बळीभाऊ हे तर एका बँड ग्रुपचे मालक आहेत. मात्र, त्यांना स्वतःच्या मुलाच्या लग्नातही बँड-बाजा वाजवता आला नाही. अनेक कारागिरांनी दुसरा तात्पुरत्या स्वरूपाचा व्यवसाय निवडला आहे. पण, अंगात भिनलेली ही कला या वाद्यापासून त्यांना वेगळी करू शकत नाही. त्यामुळे हे दिवसही जातील आणि पुन्हा डिजेचा थरार आणि सनई चौघडे वाजतील, असा त्यांना विश्वास आहे.
मात्र, बँड ग्रुपच्या मालकांवर आणि कारागिरांवर ओढवलेल्या वेळेत सरकारने मदतीचा हात देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. लग्नसोहळ्याला अनुसरून जे लहान- मोठे उद्योग- व्यवसाय आहेत, त्यांची देखील हीच अवस्था झाली आहे.
हेही वाचा - खरोळमध्ये दहा दिवसात दोन आत्महत्या तर एकाचा मृतदेह आढळला विहिरीत