लातूर - आर्थिक नियोजन कोलमडल्याने मनपातील कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देणे शक्य होत नाहीये. तसेच पाणीपट्टी आणि मालमत्ता कर अशी मिळून 120 कोटींच्या घरात थकबाकी गेल्याने विकासाला देखील फटका बसत आहे. त्यामुळे आता मनपाचे कर्मचारी वसुलीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. जे नागरिक थकबाकी भरणार नाहीत, त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून कायम आर्थिक टंचाई राहिलेली आहे. सत्ता परिवर्तन झाले पण वाढती थकबाकी कायम राहिली. याचा परिणाम शहरातील विकास कामांवर तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही होत आहे. मनपाने भाडेतत्वावर दिलेल्या गाळ्यांची मागील थकबाकी 13 कोटी तर चालू थकबाकी ही 6 कोटी आहे. तर 109 कोटी रुपये मालमत्ता कराचे थकले आहेत. दोन्ही मिळून 120 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यामुळे आता महापालिकेचे कर्मचारी वसुलीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मनपाचे कर्मचारी हे बिनपगारी काम करत आहेत. याकरिता अनेकवेळा आंदोलन, मोर्चे काढण्यात आले पण तिजोरीतच खडखडाट असल्याने प्रशासनही काहीच करू शकले नाही. मात्र आता मनपाकडून वसुली मोहीम राबवण्यात येत असून, या मोहिमेमुळे एका दिवसात 35 लाखांची वसुली झाली आहे.
तहान लागल्यावरच विहीर खोदण्याची भूमिका
पाणीपुरवठा आणि मालमत्ता कराची वसुली ही कोट्यावधींच्या घरात आहे. कर वसुलीची मदार ही महापालिकेवर असते, मात्र अनेकवेळा राजकीय वरदहस्तामुळे वसुलीत अडचण निर्माण होते, आता कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देखील पैसे नसल्याने ही वसुली मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यापारी- उद्योजक पैसे देण्यास असमर्थता दर्शवत आहेत.