लातूर - जिल्ह्यात १३ मार्चला पहिल्यांदा ७ संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. तर, गेल्या १७ दिवसांमध्ये एकूण ५९ संशयितांचे नमूने तपासण्यात आले असून सर्व अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. यापैकी एकही कोरोनाग्रस्त नसल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
सद्यस्थितीला लातूरात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसला तरी आवश्यक ती सर्व उपाययोजना राबवली जात आहे. आशा वर्कर या परजिल्ह्यातून आलेल्यांच्या नोंदी घेऊन जिल्हा प्रशासनाकडे सादर करत आहेत. गेल्या १७ दिवसांमध्ये २५ हजारहून अधिक नागरिक हे पुण्या-मुंबईहून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यापैकीच अधिकतर हे संशयित असून ५९ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सर्व अहवाल प्राप्त झाले असून एकही कोरोनाग्रस्त नाही.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे कोरोना संशयितांसाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. तसेच, १०० खाटांचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील १४ ठिकाणी शासकीय विलगीकरण कक्ष, तर खासगी रुग्णालयात १८ ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे. शहरातील अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी सुरक्षित अंतराचे नियम पाळले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जात आहे. ग्रामीण भागात मात्र, अधिकारी- लोकप्रतिनिधी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले असले तरी त्याचे पालन होताना दिसत नाही.