निलंगा (लातूर) - तालुक्यातील मदनसुरी येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तो व्यक्ती निलंगा शहरातील एका खासगी दवाखान्यात दि. 16 व 18 रोजी उपचारासाठी आला होता. दिवसभर शहरात फिरला होता. यामुळे त्याच्या संपर्कात नेमके कोण आणि कितीजण आले, याचा शोध घेणे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. यासाठी निलंगा शहरात आजपासून (दि. 21 जून) तीन दिवसांचा (जनता कर्फ्यू) लॉकडाऊन करण्याचा निर्णय नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी घेतला आहे.
मृत रुग्णाच्या संपर्कात आलेले संबंधित डॉक्टर व कम्पाउंडर यांना क्वारंनटाइन करण्यात आले आहे. मृत व्यक्ती शहरात खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करत शहरातील अनेक ठिकाणी फिरली असल्यामुळे अनेक जण त्याच्या सहवासात आले आहेत. मृत व्यक्तीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाल्यामूळे हा निर्णय घेतला आहे, असे नगराध्यक्ष शिंगाडे यांनी सांगितले.
शहरात कोरोना प्रसार होऊ नये यासाठी 22 जूनपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहणार आहे. शहरातील नागरिकांनी विनाकारण रस्त्यावरू फिरु नये, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन शिंगाडे यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी (दि. 20 जून) प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 220 वर पोहोचली आहे. त्यापैकी 139 व्यक्ती या कोरोनामुक्त झाल्या आहेत. 68 जणांवर सध्या उपचार सुरू असून आतापर्यंत 13 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
हेही वाचा -सासरच्या जाचाला कंटाळून कासार शिरसी वाडीत नवविवाहित महिलेची आत्महत्या