लातूर - निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. याही परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी हार न मानता शेतीत नवीन प्रयोग सुरू ठेवले आहेत. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता लातूर तालुक्यातील जेवळी येथील शेतकरी विजयकुमार यादव यांनी पेरूची शेती करत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
पेरू बागेतून मिळाले ४ लाखांचे उत्पन्न -
लातूर तालुक्यातील जेवळी शिवारात विजय यादव यांची 22 एकर जमीन आहे. मात्र, शेतीमध्ये अधिकचा पैसा गुंतवूनही पदरी उत्पन्न मिळेलच याची शाश्वती नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात होत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा तर सोयाबीन काढणीला आले असताना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि पीक पाण्यातचं राहिले. विजय यादव यांनी 2 एकर क्षेत्रावर गावरान पेरूची लागवड होती केली. त्यांचा हा प्रयोग यावर्षी कामी आला. गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी ही बाग जोपासली त्याचा मोबदला यंदा पदरी पडला.पेरूच्या बागेतून त्यांना ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
शेतीत वेगळे प्रयोग आवश्यक -
सोयाबीन, तूर, उडीद या खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे 22 एकर शेती असूनही उदरनिर्वाह करायचा कसा? असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मात्र, त्यांच्या गावरान पेरूच्या बागेने त्यांना संकटात तारूण नेले. पेरू गावरान असल्याने त्यांना भावही चांगला मिळला. पारंपरिक शेतीच्या जोडीला वेगळे प्रयोग आणि आधुनिकतेची कास किती महत्वाची आहे हे यादव यांनी दाखवून दिले आहे.
संकरीत पेरूपेक्षा मिळाला दुप्पट भाव -
भाजीपाला असो की फळे आजही गावरान शेतीमालाला जास्त भाव मिळतो. सध्या बाजारामध्ये संकरीत पेरू 9 ते 10 रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करतात. मात्र, विजय यादव यांच्या गावरान पेरूला 18 ते 20 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे दोन एकरातील पेरूने 4 लाखाचे उत्पन्न यादव यांना मिळवून दिले आहे.
पाण्याचे योग्य नियोजन -
हंगामी पिकांना योग्य वेळी पाणी देऊनही ही पिके पाण्यातच जातात, असे चित्र गेल्या तीन वर्षांपासून आहे. त्यामुळे यादव यांनी हंगामी पिकाबरोबरच 2 एकरातील पिकाची जोपासना कशी होईल याकडे लक्ष दिले. नोव्हेंबर अखेरपर्यंत त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पेरूंची चांगली वाढ झाली. त्याला दरही चांगला मिळत आहे.