लातूर - शहरातील गजबजलेल्या अशोका हॉटेल चौकात ऐन सिग्नलवर मंगळवारी सायंकाळी ५ वाचताच्या सुमारास ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बाप-लेक गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत असतानाच ८ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
अशोका हॉटेल येथील चौकातून संतोष करवंजे (रा. भुईसमुद्रा ता. जि. लातूर) पत्नी आणि मुलगा मनिषला घेऊन जात होते. याच वेळी गांधी चौकातून आलेल्या भरधावा मिनी ट्रॅव्हल्सने (एम.एच.४४ यु ०१५७) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही खाली पडले. मात्र, संतोष करवंजे आणि मनीष हे गंभीर जखमी झाले होते. मुलाला येथील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करत असताना त्याचा मृत्यू झाला.
अनेक दिवसांपासून शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून अशोका हॉटेल चौकातील सिग्नल अनेक दिवस बंद अवस्थेत होते. वाहतूक नियंत्रण कक्षाचे कर्मचारीही येथे हजर नसल्याने येथील वाहतूक विस्कळीत आहे. या यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे. प्रशासन आणि वाहनधारकांच्या मनमानी कारभाराचा बळी ८ वर्षीय मनिष ठरला हे मात्र नक्की. घटनेची नोंद शिवाजी नगर पोलीस ठाण्यात झाली असून ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.