लातूर - दारू पिऊन आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांचा खून मुलांनीच केल्याची खळबळजनक घटना औसा तालुक्यातील शिंदाळवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी मुलांच्या आजोबाच्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदाळवाडी येथील मच्छिंद्र काशीनाथ गरड (वय ४४) हे दारू पिऊन पत्नीला सतत मारहाण करत असे. ही बाब मच्छिद्र यांची मुले कृष्णा आणि त्याच्या भावाला आवडत नव्हती. त्याच रागातून दोघा भावांनी वडिलांचा खून केला. शिंदाळवाडी शिवारातील योगिता गरड यांच्या शेतामध्ये मच्छिंद्र यांचा मृतदेह आढळला.
यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार मच्छिंद्र यांचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या डोक्यावरही जखमा होत्या. यावरून मच्छिंद्र गरड यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. मृताचे वडील काशिनाथ गरड यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यात त्यांनी नातू कृष्णा आणि त्याच्या भावानेच मच्छिंद्र यांचा खून केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी कलम 302, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - लातुरात ब्लू पँथरचे अर्धनग्न आंदोलन; हाथरसच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी
हेही वाचा - मास्क न वापरण्याची लातूरकरांची कारणे ऐका; सोशल डिस्टन्सचे वाजले तीनतेरा!