लातूर- जिल्ह्यातील निलंगा येथे गतआठवड्यात एकाच दिवशी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची दुसऱ्या वेळेस कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे लातूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
हेही वाचा- बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर
परराज्यातील १२ व्यक्ती नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून लातुरात आले होते. त्यांनी निलंगा येथे आश्रय घेतला होता. या १२ व्यक्तींची कोरोना चाचणी केली असता यामधील ८ जणांना कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
८ एप्रिल रोजी या रुग्णांची दुसरी चाचणी करण्यात आली असून यामध्ये तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २६ व्यक्तींचीही तपासणी करण्यात आली होती. सुदैवाने यापैकी २५ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आहेत. तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच जिल्ह्याच्या सिमांवर अधिक कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय निलंगा आणि लातुरात कमालीचा शुकशुकाट पाहवयास मिळत आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे अवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.