लातूर- शहरातील संजय नगर येथील एका 25 वर्षीय तरुणाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. मात्र, हा आकस्मिक मृत्यू नसून जमावाच्या हणामारीतून झालेली घटना असल्याचा तरुणाचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानुसार हा आकस्मिक मृत्यू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अंबादास लहू वाघमारे हा शहरातील संजय नगर भागात वास्तव्यास होता. शुक्रवारी रात्री घराजवळच काही तरुण दारू पिऊन गोंधळ करत होते. गोंधळ पाहून अंबादास व त्याचे चुलते वैजीनाथ त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले. मात्र, नशेत असलेल्या तरुणांनी अरेरावी सुरू केली. यातूनच भांडण सुरू झाले आणि अंबादास याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
विवेकानंद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. परंतु, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अहवालानुसार अंबादास याच्या श्वसननलिकेत अन्न अडकल्याने मृत्यू झाला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर गुन्हा दाखल करावा अन्यथा पार्थिव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलिसांनी तपासाचे आश्वासन दिल्यानंतर पार्थिव ताब्यात घेण्यात आले. अंबादास हा एका गॅरेज दुकानात काम करीत होता. या घटनेनंतर संजय नगर भागात काही काळ तणाव होता. अंबादास वाघमारे याच्या पश्चात आई-वडील, चुलते, बहीण असा परिवार आहे.
हेही वाचा- 'वा रे वा..! मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत, अन् कोरोनाच्या पॅकेजसाठी नाहीत'