लातूर - तारण म्हणून बनावट सोने बँकेत ठेवून कर्ज उचलणाऱ्या दोघांविरोधात शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत हा प्रकार घडला आहे. बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
७५.३६० ग्राम बनावट सोने बँकेत ठेवून आरोपीने १ लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. खातेदार राजेंद्र नारायण जाधव (सेवापूर तांडा, ता.चाकूर) याने १९ एप्रिल २०१९ मध्ये सोने तारण कर्जाची मागणी केली होती. दरम्यान, सोन्याची शुद्धता लक्ष्मीकांत अरुण कुलकर्णी यांच्याकडून तपासण्यात आली होती. यावरून सोन्याची किंमत २ लाख २३ हजार एवढी काढण्यात आली. त्या बदल्यात जाधव याने १ लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. मुदत संपूनही कर्जदार हे सोने घेण्यासाठी बँकेकडे येत नसल्याने त्यांनी तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याची शुद्धता पुन्हा तपासली. त्यावेळी हे सोने भेसळयुक्त असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा - मुंबई हल्ल्यातील दोषी हाफिज सईदला ११ वर्षांचा तुरुंगवास, पाकिस्तानी न्यायालयाचा निकाल
आरोपी राजेंद्र जाधव याने असे प्रकार इतर बँकामध्येही केल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून बँकेचे व्यवस्थापक गंगाधर सांळूके यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर ठाण्यात सोन्याची शुद्धता तपासणाऱ्या लक्ष्मीकांत कुलकर्णी आणि कर्जदार राजेंद्र जाधव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.