लातूर - 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' या ब्रीदवाक्यला साजेल असे यश केशवराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. राज्यात २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये लातूर बोर्डातील १६ आणि एकट्या केशवराज विद्यालयाचे ६ विद्यार्थी आहेत. तर ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दीडशेहून अधिक आहे.
दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असला तरी लातूर पटर्नच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेचा डंका वाजविला आहे. १६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत १०० टक्के मिळविले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला शाळेतील शिक्षकांची साथ मिळाल्याने हे यश मिळाले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. देशीकेंद्र शाळेतील ३ तर केशवराज विद्यालयातील ६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
केशवराज विद्यालयातील विवेक भालेराव क्षिरसागर, सुमित अनंत मुळे, जान्हवी जीवनराव पाटील, साक्षी किशन लोमटे, श्रेया बाळासाहेब जहागीरदार, तुषार रमाकांत साबदे यांचा सहभाग आहे. या विद्यार्थ्यांना मुख्यध्यापक मंजुळ दासजी गवते, वसमतकर सर आणि संदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या इतिहासात प्रथम यंदा ६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण घेतले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा शिक्षक, कर्मचारी यांच्या वतीने सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.