लातूर - तबलिगी मरकझमध्ये सामील झालेल्या १२ लोकांच्या संपर्कात आलेल्या निलंग्यातील १४ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. उस्मानाबादहून गुबाळ मार्गे सिंदखेड येथून निलंग्यात आलेल्या १२ लोकांनी शहरातील एका मशिदीत वास्तव्य केल्याची माहिती काही लोकांना समजताच त्यांनी पोलीस प्रशासनाला याबद्दल कळवले होते. पोलिसांनी तात्काळ संबंधित बारा लोकांना ताब्यात घेतले
या १२ जणांची कोरोना चाचणी केली असता बारापैकी आठ लोकांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे, लातूर जिल्ह्यासह निलंग्यात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून निलंगा शहर आणि परिसर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहराच्या सगळ्याच रस्त्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आठ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना सध्या लातूरच्या शासकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात निलंगामधील कितीजण आले? त्यांच्या जेवणाची व्यवस्था कोणी केली? ते कोणकोणत्या भागातील लोक आहेत? याचा तपास सध्या सुरु आहे. हे लोक किती दिवसापासून शहरात वास्तव्य करत होते? बाहेर जाऊन मार्केटमध्ये किती लोकांच्या संपर्कात आले? याची कसून चौकशी सुरु आहे.
निलंगा शहरात कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्यातरी १४ लोकांपैकी १० होम क्वारंटाइन तर चौघांना शासकीय विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.